आदित्य पाटील : व्यक्ती आणि वल्ली

आदित्य पाटील : व्यक्ती आणि वल्ली

आदित्य कडूनच प्रेरणा घेऊन सुरु केलेला हा विशेष व्यक्तिचित्रणाचा ब्लॉग ! हे या मालिकेमधले पहिले पुष्प ! 

एकविसाव्या शतकाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा जगभरातील आघाडीच्या ५ मराठी ब्लॉगर्स मध्ये आदित्य पाटील याचे नाव नक्की नोंदले जाईल ( म्हणजे असा विश्वास खाजगी मध्ये बोलताना उद्योगपती उज्जवल म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे ...एका शनिवारी .. रात्री ११ नन्तर ..असो ) .आदित्य पाटील म्हणजे आमचा लहानपणीचा "आदू दादा ". माझा सक्खा चुलत भाऊ अनुप दादा आणि आदू दादा हे न्यू इंग्लिश स्कुल मधले वर्गमित्र आणि दोघांमध्ये कोण पहिला नम्बर मिळविणार याची नेहमी स्पर्धा असायची ! दहावी नन्तर रुपारेल कॉलेज आणि मग मुंबई ला इंजिनियरिंग वगैरे करताना आदित्य दादा चा वसई शी फारसा सम्पर्क उरला नाही .त्यानंतर आय टी क्षेत्रात टी सी एस ,जे पी मॉर्गन अश्या आघाडीच्या कम्पन्यांमध्ये करियर घडविताना जगभर फिरलेला हा अवलिया माणूस शनिवारी वसई ला आला की अजून वाडी-बागायती -बावखले यांमध्ये रमतो ! त्याचे वसई चे आयुष्य,वसई ची संस्कृती ,निसर्ग ,शाळेतील आठवणी यावरील विपुल ब्लॉग लेखन जगप्रसिद्ध आहे .

 न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघाचे काम सुरु केले तेव्हा पासून आदित्य दादा परत माझ्या सम्पर्कात आला . आणि बघता बघता " दादा "  चा नुसता आदित्य झाला ! खरं तर त्याच्या आणि माझ्या वयात ९ वर्षांचा फरक .तो न्यू इंग्लिश स्कुल मधून अनुप दादा बरोबर दहावी झाला तेव्हा अस्मादिक दुसऱ्या इयत्तेत मराठी चे धडे गिरवीत होते . पण हे वयाचे अंतर आमच्या आड कधीच आले नाही . आदित्य गेले सहा वर्षे आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी महासंघाच्या क्रिकेट स्पर्धा एन एन पी एल चा "कमिशनर" म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे . आणि दर वर्षी स्पर्धा सम्पल्यावर तो रिटायरमेंट जाहीर करतो ! पण पुढच्या वर्षी जानेवारी आला की आमचे अमोल आणि प्रशांत पाटील गपचूप कट करून त्याला परत "कमिशनर" ची टोपी घालायला भरीला पाडतात .याही वर्षी एन पी एल आता सम्पली आहे आणि त्याने पुढील दोन वर्षात राहुल ठोसर ला पदभार देऊन रिटायर होणार अशी नवीन घोषणा केली आहे . अमोल आणि प्रशांत चे काम त्यामुळे वाढले आहे .बघूया जानेवारी २०१८ मध्ये काय जादू करतात ते . 

आदित्य हा आमच्या न्यू इंग्लिश स्कुल माजी  विद्यार्थी संघाच्या ग्रुप मधला एक "गणिती" माणूस. माहित नाही कुठून कुठून गणिती कोडी आणून त्याचा किस पाडत बसतो हा .अगदी आमचे < CENSORED : थट्टा मस्करी न झेपल्याने यांचे नाव या ब्लॉग मधून काढून टाकले आहे > त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी काही बाही व्हाट्सअप मेसेजेस ची शृंखला पाठवितात तरी हा पठया दुर्लक्ष करतो आणि टिकून रहातो . फोन वर देवनागरी लिपी मध्येच टाईप करता येते हे मात्र त्याला अजून डोंगरे मास्तरांनी शिकविले नसल्याने रोमन लिपीत मराठी टायपिंग करून  घेणारा आदित्य स्वतः एक वल्ली आहे ! त्याची निरीक्षण शक्ती अफाट आहे. त्याचे ब्लॉग्स वाचले की त्याचा अभ्यास दिसून येतो . या माणसाचा अजून एक छन्द म्हणजे वीणा वर्ल्ड मधून सुट्टीत फिरायला जाणे आणि रोजच्या प्रवासावर ब्लॉग लिहिणे .वीणा ताई पाटील यांची फुकट मध्ये यापेक्षा अजून चांगली जाहिरात कोणी केली नसेल.वीणा वर्ल्ड आदित्य ला फुकट प्रवासाला नेतात आणि बदल्यात ब्लॉग लिहून घेतात अशी कुजबुज १९८८ च्या एस एस सी बॅच च्या पार्ट्यां मध्ये होते असा गुप्तचरांचा रिपोर्ट सुद्धा आहे .खरे खोटे काय हे वसई च्या मटण आणि हॉटेल व्यवसायावर राज्य करणारे आमचे मित्र आणि अजून एक १९८८ एस एस सी मेम्बर अनिल भाऊ जाधव यांना विचारावे लागेल . 

आदित्य चा अजून एक चांगला गुण म्हणजे बर्फ़ा सारखे थंड डोके . या माणसाला मी आयुष्यात एकदाच भडकलेला पहिला आहे .२०१४ च्या एन पी एल मध्ये १९८८ च्या टीम विरुद्ध एक पंचांचा निर्णय गेला आणि भाऊ भडकले. तो किरकोळ प्रसंग सोडला तर या माणसाला राग का येत नाही याचे गुपित केवळ प्राजक्ता वहिनीच जाणोत ! कुठल्याही प्रकल्प  तयारी करताना प्रॉपर डॉक्युमेंटेशन कसे करावे हे आदित्य  कडून शिकावे .आणि लोकांकडून काम कसे करून घ्यावे हे पण याच्याच कडून शिकावे .कुठेही बोंबाबोंब नाही ,स्वतः च्या नेतृत्वा चा गर्व नाही आणि तरीही अगदी ५० वर्षांच्या माजी विद्यार्थ्यांपासून ते नुकतेच दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यां पर्यंत सर्व कार्यकर्ते या माणसाचे मुकाट पणे ऐकतात आणि गपचूप सांगितलेली कामे करतात . 

कॉर्पोरेट क्षेत्रात मराठी आणि विशेषतः वसई च्या मुलांना नोकरी उद्योगासाठी कशी मदत करता येईल ,शाळेतील मुलांना कॉप्युटर कोडिंग चे बेसिक्स कसे शिकविता येतील या प्रोजेक्ट्स वर सध्या आदित्य काम करीत आहे . वसई विरार मध्ये मोठ्या कम्पन्यांना आणण्यासाठी आणि वसई च्या मुलांना मुंबई ला नोकरी साठी न जावे लागता इकडेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी  काय करता येईल हा सुद्धा त्याच्या चिंतनाचा विषय आहे . न्यू इंग्लिश स्कुल परिवारातील "व्यक्ती आणि वल्लि " या विषयावर लेखमाला सुद्धा सुरु केली आहे त्याने. पण म्हटलं हा सगळ्यांवर लिहिल पण यांच्यावर कोण लिहिणार ! म्हणून आदित्य वर जमेल तसे लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न . 

कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदी काम करून सुद्धा समाजाचे देणे म्हणून काम करीत राहणाऱ्या या मित्राला माझा सलाम .

Comments